जागतिक आरोग्य दिन साजरा

खडकी :स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालय, खडकी येथे शारीरिक शिक्षण विभागातर्फे जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संगीता लोहकपुरे, इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुरेश पंडीत, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. राहुल घुगे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्या लोहकपुरे मॅडम यांनी मागील वर्षापासून जागतिक स्तरावर जीवघेणा असणाऱ्या कोरोना आजाराविषयी घेण्याच्या दक्षतेबद्दल सांगताना सर्वांनी आपली शारीरिक क्षमता वाढविणे, योग्य अनुकुल आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, व्यसनांपासून दूर राहणे, ध्यान धारणा करणे, मास्क लावणे, योग्य अंतर राखणे, कामाशिवाय घराबाहेर न पडणे, वारंवार हात धुणे, घराची व परिसराची स्वच्छता राखणे, आरोग्यवर्धक काढा घेणे, हळदीचे दूध घेणे, सौम्य व सात्विक आहार घेणे, आहारात हिरव्या पालेभाज्या व फळे यांचा समावेश करतानाच भाजीपाला निर्जतुक करून वापरण्याची दक्षता घेणे यांचे पालन करण्यास सांगितले. घरी कितीही वैभव, संपत्ती असेल पण ते उपभोगण्यासाठी आपण आरोग्यदृष्ट्या सक्षम, निरोगी व निर्व्यसनी राहणे जरुरीचे आहे असे सांगताना आपल्या आरोग्याची काळजी घेऊन सुदृढ नागरिक बनून राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रा. डॉ. पंडित यांनी स्वतःची मानसिक शक्ती सर्व दुःखांचा, संकटाचा नाश करते तेव्हा सकारात्मक विचारसरणीवर जास्त भर देऊन दैनंदिन कामामध्ये क्रियाशीलता आणावी, ‘ मन चंगा तो कठौती मे गंगा’ असे सांगताना सर्वांनी नोकरी, व्यवसाय सांभाळताना स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे असे सांगितले.

प्रा घुगे यांनी सात्विक आहार, पुरेशी विश्रांती, श्रम-कामाचे योग्य नियोजन, शारीरिक सुदृढता,निर्व्यसनी जीवन हे निरोगी जीवनाचे रहस्य आहे असे सांगितले. कार्यक्रमाला सर्व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविक डॉक्टर लोहकपुरे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर पंडित यांनी केले.