इंग्रजी भाषा दिन व जागतिक पुस्तक दिन
इंग्रजी भाषा दिन व जागतिक पुस्तक दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा. खडकी, अकोला. स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयात ग्रंथालय विभाग व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पुस्तक दिन व इंग्रजी भाषा दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे तर ग्रंथालय विभागाचे ग्रंथपाल प्रा. सिद्धार्थ पाटील व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. राहुल घुगे उपस्थित होते. प्रा. सिद्धार्थ पाटील यांनी विद्यार्थ्यांना ‘पुस्तक दिनाच्या’ हार्दिक शुभेच्छा दिल्यात.
त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगून आजच्या या स्मार्टफोनच्या युगात विद्यार्थ्यांची लिखाणाची व वाचनाची सवय कमी झाल्याबद्दल ची खंत याप्रसंगी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी ‘वाचाल तर वाचाल’ या म्हणीनुसार आयुष्यात यशस्वी व्हायचे असल्यास वाचन संस्कृतीवर विशेष भर दिला पाहिजे असे मत मांडले.
23 एप्रिल हा ‘इंग्रजी भाषा दिन’ म्हणून देखील साजरा करण्यात येतो याप्रसंगी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. राहुल घुगे यांनी इंग्रजी भाषेबद्दल ची माहिती विद्यार्थ्यांना सांगून या भाषेतील संपन्न ग्रंथसाहित्या बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली, तसेच या भाषेत निपुणता प्राप्त करून आपल्या शैक्षणिक यशस्वितेचा आलेख उंचवावाअसे मत मांडले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे यांनी देखील विद्यार्थ्यांनी स्वतः मध्ये वाचनाची गोडी निर्माण करावी असे मत मांडले कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.