युवक दिन साजरा

स्थानिक खडकी येथील श्री धाबेकर कला महाविद्यालयात गुरुवार दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी मॉ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली . शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. संगीता लोहकपुरे यांच्या विभागातर्फे ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ‘युवक दिन’ साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद व मॉ जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयातील खेळाडूंच्या सत्काराचेही आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती राधादेवी गोयनका महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख लेफ्ट. प्रा. श्वेता मेंढे या प्रामुख्याने उपस्थित होत्या.

प्रास्ताविकामध्ये डॉ. लोहकपुरे यांनी श्री धाबेकर कला महाविद्यालयातील विद्यार्थी हे कमवा व शिका या संदेशाप्रमाणे शिक्षण घेत असतात असे सांगतानाच विद्यार्थ्यांनी याही खडतर परिस्थीतीत आपल्या अंगभूत क्रिडा नैपुण्याकडे दुर्लक्ष न करता ११ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला व कबड्डी स्पर्धेत महाविद्यालयाला झोनल फायनल जिंकून विद्यापीठ स्तरावर प्रतिनिधित्व मिळवून दिल्याचे सांगितले . याशिवाय शरीरसौष्ठव स्पर्धेतही करण रणपिसे या विद्यार्थ्याने कलर होल्डर होण्याचा मान मिळविल्याचे सांगून महाविद्यालयाच्या क्रिडा विभागाची पार्श्वभूमी थोडक्यात सांगून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले .

याप्रसंगी प्राचार्य डॉ. तिवारी मॅडम यांनी खेळाडूंचे व डॉ. लोहकपुरे मॅडम यांचे कौतुक केले व स्वामी विवेकानंद आणि मॉ जिजाऊ यांच्या कार्यावर प्रकाश टाकून थोडक्यात त्यांच्या कार्याचे महत्व पटवून दिले.

प्रमुख अतिथी प्रा. श्वेता मेंढे यांनी विद्यार्थ्यांना योग्य वेळेची वाट न बघता योग्यवेळ निर्माण करा , परिश्रमाची कास धरा व संधीचे सोने करा आणि यश मिळवा असे सांगताना महिला महाविद्यालयातील महिला आज विविध क्षेत्रात यशस्वी होऊन नोकरी करीत आहेत हे उदाहरणासहित सांगितले .

याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी , खेळाडू , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती .

आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.